Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पशुपालक बांधवांसाठी ऑनलाईन प्रणाली लागू : प्रतीक्षायादी असणार ५ वर्षासाठी ग्राह्य

पाचोरा, प्रतिनिधी | ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत असून याचा लाभ पशुपालक यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शासनाने एखाद्या‌ योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्यात येणार आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल ? हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई, म्हशींचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन लाभार्थी निवड प्रक्रिया सन – २०२१ – २०२२ या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ – https://ah.mahabms.com

 

अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध)

 

अर्ज करण्याचा कालावधी
४ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१

टोल फ्री क्रमांक – १९६२ किंवा १८००-२३३-०४१८

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध‌ करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन जि. प. चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. व्ही सिसोदे यांनी केले आहे.

Exit mobile version