Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार साहेब….तुम्हीच कॉंग्रेसमध्ये या ! : थोरातांचे खुले निमंत्रण

मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसची तुलना रया गेलेल्या जमीनदाराशी करणारेशरद पवार यांनीच कॉंग्रेसमध्ये यावे असे निमंत्रण देऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

 

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका करतांना या पक्षाची तुलना रया गेलेल्या जमीनदाराशी केली होती. या विधानानंतर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. कॉंग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी कॉंग्रेसचं काही नुकसान होणार नाही. पण अपेक्षा अशी आहे की, या विचाराचे जे आहेत. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. एकत्रं यावं. कॉंग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्रं लढाई करावी, असं आवाहन थोरात यांनी केलं.

 

दरम्यान, यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षण प्रश्नावर आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन काम करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलाय त्यावर आम्ही चर्चा करू. सर्वांना सोबत घेऊन चर्चा करूनच आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. हे वर्ष नैसर्गिक संकटाच आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे चालू आहेत. त्यामुळे पंचनामे आल्यावरच त्यावर काय मदत करायची हे ठरवलं जाईल. आज त्यावर बोलणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच किरीट सोमय्या बोलतात आणि ईडी तशी वागते अशी जनतेचे भावना झाली आहे. जनता आता वेगळ्या दृष्टीने याकडे पाहू लागली आहे. केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर सुरू असल्याची टीका देखील थोरात यांनी केली.

Exit mobile version