Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवारांच्या घरावर मोर्चा काढणार- मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

 

 

नाशिक : वृत्तसंस्था । २ डिसेंबरपर्यंत मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्‍न न सोडविल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी नाशिकमध्ये बैठक झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं आहे. येत्या २ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. यात मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न जोवर मार्गी लागत नाही तोवर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या याच भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Exit mobile version