Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्वतरांगातील माती अशास्त्रीय पद्धतीने काढल्याने उत्तराखंडसारख्या दुर्घटना

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हिमालयाच्या पर्वतरांगातील माती पायाभूत प्रकल्पांसाठी अशास्त्रीय पद्धतीने काढून टाकल्यामुळे परिसंस्था डळमळीत होऊन उत्तराखंडसारख्या दुर्घटना घडत आहेत, अशी माहिती भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण खात्याच्या एका माजी अधिकाऱ्याने दिली आहे.

 

भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेचे माजी अधिकारी त्रिभुवन सिंग पानगटी यांनी सांगितले, की ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. हिमालयात जलविद्युत कंपन्या या माती व भूशास्त्राची काही माहिती नसताना काम करीत असतात. त्यामुळे नैसर्गिक दुर्घटना होतात. हिमालयाच्या मातीचे थर मोठय़ा यंत्रांच्या मदतीने विलग केले जातात. तेथील मातीचे गुणधर्म विचारात न घेताच ही कृती केल्याने उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्य़ात घडली तशा दुर्घटना होतात. जर या कंपन्यांना तेथे काम करायचेच असेल, तर त्यांनी आधी तेथील भूगर्भशास्त्रीय ज्ञान करून घेतले पाहिजे. हिमनद्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यानंतरच जलविद्युत प्रकल्पांची कामे सुरू करावीत.

 

ते म्हणाले की, राज्य सरकारने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करणे गरजेचे आहे. जर या तज्ज्ञ समितीची स्थापना केली नाही तर पुढेही माती ठिसूळ होऊन अशा दुर्घटना घडत राहतील व प्राणहानी होत राहील. त्यामुळे हे टाळण्यासाठी अशा समितीची गरज आहे. ती स्थापन केली नाही तर अधिक मोठा पूर धरण किंवा हिमनद्या फुटून येऊ शकतो.

Exit mobile version