Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परिवर्तन यात्रेच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादीची बैठक

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी परिवर्तन यात्रेच्या नियोजनासाठी आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील यांनी या पैठकीला मार्गदर्शन केले.

वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

‘निर्धार परिवर्तनाचा !’ अशी हाक देऊन राष्ट्रवादीतर्फे परिवर्तन यात्रा राज्यभर सुरू झाली असून १८ रोजी सकाळी ११ वाजता पहिली सभा चाळीसगाव, दुसरी पारोळा तर तिसरी सभा जळगाव शहरात होणार आहे. त्यानंतर १९ रोजी चोपडा, जामनेर,मलकापूर अशी ही परिवर्तन यात्रा असेल. या यात्रेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी वरिष्ठ नेते उपस्थित असतील. दरम्यान, या यात्रेच्या नियोजनाबाबत आज झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

कामाला लागा

याप्रसंगी दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, मार्चमध्ये आंचारसंहिता लागण्याची शक्यता असून दोन महिन्यात तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण, जागा वाटप कसे होणार या चर्चात पदाधिकार्यांनी पडू नये, यासंदर्भात वरिष्ठ पातळींवर चर्चा सुरू असून पक्षाध्यक्ष व पक्ष जे ठरवेल तो अंतिम निर्णय राहिल, असेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात जरी चर्चा झालेली नसली तरी उमदेवारांनी आतापासून खर्चाला थोडी थोडी सुरूवात करावी, निवडणुकांमध्येच खर्च करावा असे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, स्थानिक पातळीवर केलेली कामे कागदारवर न राहता ती पक्षाच्या अ‍ॅपवर लोड करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नेते व पदाधिकारी उपस्थित

आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार डॉ. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, गफ्फार मलिक, अरूण पाटील, प्रमोद पाटील, अनिल भाईदास पाटील, राजेश चौधरी आदींसह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

Exit mobile version