Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परिचारिकांना किमान समान वेतनासाठीची कार्यवाही सुरू करावी-अमित देशमुख

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोविड काळात देशाला डॉक्‍टरांबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

 

महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देशमुख यांनी हे निर्देश दिले.

 

किती रुग्णांमागे एक डॉक्‍टर असावा हे जसे निश्‍चित करण्यात आले आहे, तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्‍टरांबरोबरच परिचारिकासुध्दा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने परिचारिकांचे किमान समान वेतन ठरविण्यात यावे आणि शासकीय आणि खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्यांना ते समान मिळावे याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने सुरू करावी, असे देशमुख म्हणाले.

 

सध्या राज्यात मुंबई आणि पुणे वगळता महाराष्ट्रातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात रुग्णालयांमध्ये परिचारिकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात मंडळाने परिचारिकांची आवश्‍यकता किती आहे याबाबतचा अहवाल तयार करावा.

 

तसेच परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यालाही प्राधान्य देण्यात यावे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात नर्सिंग अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रॅक्‍टीकल परीक्षा हॉस्पीटलमध्ये घेण्याबरोबरच ऑनलाइन थेअरी परीक्षा घेता येऊ शकेल याबाबतची शक्‍यता तपासावी. शैक्षणिक शुल्काबाबतचे धोरण ठरवावे, मंडळावर आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या पदांची नियुक्ती करावी आदी विषयांवर आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

Exit mobile version