Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परतीच्या पावसाचा तडाखा

 

मुंबई-वृत्तसंस्था । परतीच्या पावसाने आज अर्ध्या महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. गुरुवारी संपूर्ण कोकणला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

परतीच्या पावसाचं राज्यात धुमशान सुरू आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, आज मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

कोल्हापूर शहर आणि परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास वाढलेला पावसाचा जोर उशिरापर्यंत कायम होता. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. दरम्यान, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्यावरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पुणे शहरात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 26 मि. मी. पावसाची नोंद झाली. दुपारी चारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान 15 व 16 रोजी शहराला पुणे वेधशाळेने यलो अलर्ट दिला असून मोठ्या पावसाची शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

या पावसाच्या तडाख्यातून लातूर, धाराशीवही बचावले नाही. कोकणात तर हा पाऊस गेले आठ दिवस धो-धो कोसळतो आहे. सिंधुदुर्ग जिह्यात बहुतेक ठिकाणी कापणी केलेले भात अक्षरश: पाण्यावर तरंगत असून दाणा पुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version