Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पदोन्नती आरक्षणसंदर्भात लोहार समाज विकास महासंघाचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । भटके विमुक्तांच्या पदोन्नती आरक्षणासंदर्भात अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघातर्फे आज गुरुवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने भटके विमुक्तांच्या आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात नुकतेच प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात भटके-विमुक्तांना पदोन्नती ध्ये आरक्षण देणे असंविधानिक आहे, असे नमूद केले आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्र सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अतिशय घातक असून भटक्या-विमुक्तांना सामाजिक जीवनातून पूर्णपणे उठविण्याचा प्रयत्न आहे. भटके-विमुक्त प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे असंविधानिक आहे, ही शासनाची भूमिका असून भटके-विमुक्तांचे आरक्षण नष्ट करण्याचा कट असला तर जात नाही ना अशी चिंता तमाम विमुक्त भटक्या समाजाला सतावत आहे. राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन विमुक्त भटक्या यांच्या पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आवश्यक ती दुरुस्ती करून भटके विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम कसे राहील याची दक्षता घ्यावी, अन्यथा या समाजाकडे लढण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघाचे जिल्हा प्रमुख एकनाथ लोहार, विभाग प्रमुख विजयराव रूम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद ढगे, लोहार युथ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चेतन गाडीलोहार, कोषाध्यक्ष भूषण सांगोरे, सचिव शुभम लोहार, मोतीलाल लोहार यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

Exit mobile version