पथराड येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पथराड येथील माहेर असलेल्या विवाहितेची सोमवारी ६ सप्टेबर रोजी प्रसूती होवून मुलीला जन्म दिला. यानंतर लागलीच तीची प्रकृती बिघडल्याने आज सोमवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तीला जळगावातील रुग्णालयात हलवण्यात आले. काही तासातच म्हणजे दुपारी दीड वाजता महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप पतीसह कुटुंबियांनी केला आहे.

मोनाली विपीन माले (वय २३, रा. वलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. मोनाली हिची दोन वर्षांपूर्वी पहिली प्रसूती सामान्य झाली होती. यावेळी तीने एका मुलीस जन्म दिला. तर सोमवारी ६ रोजी यावल येथील आई हॉस्पीटलमध्ये दुसरी प्रसूती झाली. ही प्रसूती सिझेरीयनने होऊन मुलीस जन्म दिला. दरम्यान, प्रसूतीनंतर तीची प्रकृती चांगली होती. रात्री तीने पतीसह अनेक नातेवाईकांशी फोनवरुन गप्पा देखील मारल्या. आज मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून विवाहितेची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी तिला तातडीने जळगावला हलविले. उपचार सुरू असताना दुपारी १.३० वाजता तीचा मृत्यू झाला. विवाहितेच्या अकस्मात मृत्यूने नातेवाईक सुन्न झाले आहेत. दरम्यान प्रसूती करणाऱ्या यावल येथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच मोनालीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती विपील विनायक माले यांनी केला आहे. सायंकाळी ७ वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content