Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकारिता मूल्ये आणि तंत्रज्ञानावर आधारित असावी — शेखर पाटील

 

फैजपूर, प्रतिनिधी । पत्रकारिता सातत्यपूर्ण बदलणारी प्रक्रिया असून येणारा काळ पत्रकारांसाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी प्रत्येकांनी गेलेल्या काळाला वंदन करून भविष्यकालीन आव्हाने पेलण्यासाठी टेक्नोसव्ही आणि व्हॅल्यूबेस्ड पत्रकारितेला अंगीकारावे असे आवाहन लाईव्ह ट्रेंड्स न्यूजचे संपादक शेखर पाटील यांनी व्यक्त केले.

ते सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट व सतपन्थ संस्थान, वढोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार बांधवांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. दर्पणकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दिनाच्या औचित्याने परिसरातील पत्रकार बंधूंच्या भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते.  कार्यक्रमाला शहरातील पत्रकार बंधूंनी उपस्थिती दिली. शेखर पाटील यांनी ‘पत्रकारितेचे बदलते स्वरूप व मूल्याधारित पत्रकारिता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार राजूमामा भोळे यांनी पत्रकारिता अत्यंत जोखमीची असून समाजातील इष्ट व अनिष्ट घडामोडींना समाज मनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी यामुळे स्वतःचा आणि परिवाराचा जीवही ही धोक्यात टाकावा लागतो. अशा परिस्थितीत सर्व पत्रकार बंधूंना विमा संरक्षण कवच असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सरकार दरबारी यासाठी प्रयत्नरत राहू असे आश्वासन दिले.  अध्यक्षीय भाषणात महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना कर्तव्य सांभाळताना परिवाराची काळजी घ्या, स्वतः सुरक्षित राहून समाज उभारणीसाठी योगदान द्या असे आवाहन केले.

सन्मान सोहळ्यात वासुदेव सरोदे, प्रा उमाकांत पाटील, निलेश पाटील, अरुण होले, योगेश सोनवणे, नंदकिशोर अग्रवाल, समीर तडवी, फारुख शेख, डॉ राजेंद्र तायडे, सलीम पिंजारी, मयूर मेढे, संजय सराफ, सलीम पिंजारी, राजू तडवी,इदू पिंजारी आदी पत्रकार महोदयांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन लेफ्ट डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.

Exit mobile version