Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, दिशाभूल केल्यास कारवाई करणार : डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई (वृत्तसंस्था) पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजली ने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे.प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव(कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिराती मुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे.कोरोनील चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

Exit mobile version