Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांचं निवासस्थान भाड्याने देण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय !

 

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तान सरकारने पंतप्रधान इम्रान खान यांचं इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये असणारं अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

 

पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटकडून यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावरुन खिल्ली उडवली जात असून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.कॅबिनेटने पंतप्रधानांचं हे अधिकृत निवासस्थान सांस्कृतिक, शैक्षणिक, फॅशन तसंच इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी शिस्त पाळली जावी तसंच नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहे.

 

याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तेहरीक-ए-इन्साफ  सरकारने पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान शैक्षणिक संस्थेत रुपांतरित करण्याचं जाहीर केलं होतं.  सरकारने वसाहत परंपरा मोडण्यासाठी राज्यपाल आपल्या सरकारी निवासस्थानांमध्ये राहणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मोठ्या प्रमाणात खर्च कमी करण्यासंबंधीही घोषणा केली होती. हा पैसा लोककल्याण योजनांसाठी वापरला जाऊ शकतो असं पाकिस्तान सरकारने म्हटलं होतं.

 

याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपलं इस्लामाबादमधील अधिकृत निवासस्थान सोडलं होतं आणि आपल्या मालकीच्या घऱात राहण्यासाठी गेले होते.  २०१९ मध्ये पंतप्रधानांचं निवास्थान ब्रिगेडियर वसीम इफ्तिखार यांच्या मुलीच्या लग्नासाठी भाड्याने देण्यात आलं होतं. पंतप्रधान इम्रान खानदेखील या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते.

 

पाकिस्तानचे शिक्षणमंत्री शफाकत मेहमूद यांनी त्यावेळी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाची देखभाल करण्यासाठी जवळपास ५० कोटींचा खर्च येत असल्याची माहिती दिली होती. यामुळेच इम्रान खान यांनी निवासस्थान सोडल्याचं ते म्हणाले होते.

 

Exit mobile version