Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल – संभाजी भिडे

 

 सांगली  : वृत्तसंस्था । पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलं आहे.

 

संभाजी भिडे सांगलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी पायी वारी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी  जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल असं ते म्हणाले आहेत.

 

संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, आपल्या सर्वांना कोरोनामुक्त भारत व्हावा असं वाटतं आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत,” असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे. चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेवून पालख्या निघाव्यात असं आश्वासन दिले होतं. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आलं आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

“शासनाकडून वारकर्‍यांचा विश्वासघात झाला असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आलं आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

 

यंदाच्या आषाढीला २० जुलै रोजी मानाच्या दहा पालख्यांना वाखरी ते पंढरपूर दरम्यान प्रातिनिधिक पायी वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच शासकीय महापूजेला तसेच ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. आषाढी एकादशी दिवशी २० जुलै रोजी स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे.ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. याशिवाय अन्य कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

 

Exit mobile version