Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंजाब , हरयाणा , उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नाराजीने भाजप हादरला

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्यांविरोधात  दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू  आहे  त्याचे तीव्र पडसाद निवडणुकांमध्ये  उमटण्याची भीती आहे. विशेषतः पंजाब, हरयाणासह पश्चिम उत्तर प्रदेशात या पट्ट्यात शेतकरी पसरु लागल्यामुळे भाजपा नेत्यांची चिंता वाढली आहे.

 

शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासंदर्भात भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंगळवारी हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील पक्ष नेत्यांसोबत चर्चा करुन त्यांच्याकडून परिस्थिती समजून घेतली.

 

शेतकरी आंदोलन जाट पट्टयात पसरु लागल्यामुळे भाजपा नेत्यांची चिंता वाढली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंगळवारी हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील पक्ष नेत्यांसोबत चर्चा करुन त्यांच्याकडून परिस्थिती समजून घेतली. साखर पट्टयात आंदोलक शेतकऱ्यांच्या महापंचायती होत असताना, पक्ष प्रमुख जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, खासदार आणि जिल्ह्याच्या  नेत्यांबरोबर चर्चा केली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बलियान सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तोमर आणि बलियान दोघे जाट समाजातून येतात.

 

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे सांगण्याची मोहिम आणखी तीव्र करा. जेणेकरुन दिशाभूल करणाऱ्यांना लोकांकडूनच उत्तर मिळेल अशी सूचना शाह यांनी बैठकीत पक्ष नेत्यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपा नेत्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे, त्याची पक्ष नेतृत्वाला माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

जाट समाजाच्या नाराजीचा या भागातील लोकसभेच्या ४० जागांवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे हे आंदोलन आणखी पसरणार नाही, याची भाजपाला काळजी घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांना खाप नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. कृषी कायद्यावरुन लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामधील भाजपा पदाधिकाऱ्यांना रणनिती बनवण्याची सूचना करण्यात आली आहे.

Exit mobile version