Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंकजा मुंडे यांचा पत्ता कट ? : भाजप देणार ‘या’ नेत्यांना संधी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना विधानपरिषदेच्याही घडामोडी सुरू झाल्या असून यात भाजपतर्फे पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

विधानपरिषदेची निवडणूक २० जून रोजी होत असून भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे ही नावे निश्‍चीत असून याबाबत लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांचा पत्ता या वेळेसही कट होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

भाजपतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावं दिल्लीत पाठवण्यात आली होती. त्यापैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या पाच उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

Exit mobile version