Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय ईडी पुढे जाणार नाही ; अनिल देशमुखांची भूमिका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमूख यांनी मांडली आहे.

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचव्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

“माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

 

याआधी ५व्यांदा समन्सं बजावल्यानंतर अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version