Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायालयाच्या आदेशानुसार ना.बच्चू कडूंवर गुन्हा दाखल

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावांमध्ये बदल तसेच अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामावर निधी खर्च अपहार प्रकरणी दाखल तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशानुसार आ.बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार थेट मंत्र्यांवरच गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा नियोजन समितीकडे रस्ते कामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यात जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी बदल करून अस्तित्वातच नसलेल्या रस्त्यावर सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये निधीचा अपहार केला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती

यासंदर्भात अकोला पोलिसांनी कारवाई न केल्याने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत अकोला न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यानुसार पालकमंत्री लोकसेवक यांच्याविरुद्ध तक्रार असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी किमान ९० दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते. यासंदर्भात राज्यपालांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते.
कायद्यातील तरतुदीनुसार ९० दिवसांमध्ये राज्यपालांकडून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात उत्तर न आल्याने न्यायालयाकडून अखेर मंगळवारी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधातील तक्रारीवर तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले. त्यामुळे अकोला शहर कोतवाली पोलिसांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या विरोधात भादंवि कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ अशा कलमांनुसार थेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version