Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायाधीश बदलीवरून सुरजेवालांचे भाजपला तीन प्रश्‍न

नवी दिल्ली वृत्तसंस्था । न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला तीन बोचणारे प्रश्‍न विचारले आहेत.

दिल्लीमधील हिंसाचार प्रकरणी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चिथावणीखोर विधाने करणार्‍या भाजपाच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल करत दिल्ली पोलिसांना फैलावर घेणार्‍या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यावरुन आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अनुषंगाने पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला तीन प्रश्‍न विचारले आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी असे आवाहन सुरजेवाला यांनी केले आहे.

१. आपल्या पक्षाच्या नेत्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली, तर दिल्लीतील हिंसा दहशतवाद आणि अफरा-तफरीमध्ये तुमचा हात होता याचा पर्दाफाश होईल अशी तुम्हाला भीती होती का?

२. निष्पक्ष आणि योग्य न्याय होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही किती न्यायाधीशांच्या बदल्या करणार आहात?

३. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या द्वेष पसरवणार्‍या वक्तव्याला योग्य ठरवण्याचा अन्य कोणता मार्ग नसल्याने तुम्ही न्यायाधीशांची बदली केली? (बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांनी भाजप नेत्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते)

याप्रसंगी सुरजेवाला पुढे म्हणाले की, गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात वकील असलेले ज्येष्ठ विधीज्ज्ञ गोपाल सुब्रमण्यम याची नियुक्ती मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमचया आदेशाची पर्वा न करता बळजबरीने रोखली होती. याचीच पुनरावृत्ती या प्रकरणात झाली असल्याची टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

Exit mobile version