न्यायव्यवस्थेवरही मोदी सरकारचे नियंत्रण — राहुल गांधी

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायपालिकेवर लादत असून, न्यायालयांनी जे करणं आवश्यक आहे, ते सरकारकडून करू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेवर मोदी सरकारचे नियंत्रण आहे,” अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

 

न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर गंभीर आरोप केला

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मालाप्पुरम येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “मोदी सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायव्यवस्थेवर लादत आहे. केंद्र सरकार काही गोष्टी होऊ देत नाही किंवा जे करणं आवश्यक आहे, ते न्यायपालिकेला करू देत नाही. हे फक्त न्यायालयांच्या बाबतीतच नाही, तर ते लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करू देत नाही. निवडणूक जिंकणं म्हणजे हरणं आणि हरणं म्हणजे जिंकणं असं पहिल्यादांच घडत आहे,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

 

 

राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. भारत-चीन सीमावाद, कोरोना आणि लॉकडाउन व पेट्रोल डिझेलच्या किंमतीनंतर राहुल गांधी यांनी प्रथमच न्यायव्यवस्थेवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना भाजपा काय उत्तर देणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Protected Content