नेतृत्व सिद्ध करण्यासाठी नव्हे ; शेतकऱ्यांसाठी संघर्ष मान्य — आ. मंगेष चव्हाण

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । मी नेतृत्व सिद्ध करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आणि लढत राहणार अशी भूमिका आज चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सपष्ट केली. ते करगाव रस्त्यावरील शासकीय गोदामात सुरू झालेल्या ज्वारी – मका – बाजरी आदी भरडधान्य खरेदीसाठीच्या शासकीय खरेदी केंद्राच्या काटा पूजन प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी भडगाव शेतकी संघाचे चेअरमन प्रताप हरी पाटील, तहसीलदार अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदारशेठ राजपूत, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, बी.वाय.चव्हाण, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.

आ. मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, मोठ्या विश्वासाने भडगाव शेतकी संघाकडे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. नोंदणीसाठी पारदर्शक प्रक्रिया त्यांनी राबविली त्याचे कौतुकच आहे. चेअरमन प्रताप नाना व त्यांची सर्व यंत्रणा ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा भरड धान्य मोजून शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत इतकी झाली नोंदणी…

चाळीसगाव शेतकी संघाला धान्य खरेदीतील गैरप्रकार भोवल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी भडगाव शेतकी संघाला चाळीसगाव तालुक्यातील धान्य खरेदीचे अधिकार दिले होते. भडगाव शेतकी संघातर्फे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी सुरू करण्यात आलेली असून आतापर्यंत 343 शेतकऱ्यांनी मका, 69 शेतकऱ्यांनी ज्वारी साठी व 56 शेतकऱ्यांनी बाजरीसाठी नोंदणी केली आहे. शासनातर्फे मक्याला 1850 रुपये, ज्वारीला 2620 रुपये व बाजरीला 2150 रुपये इतका हमीभाव मिळणार आहे. नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन भडगाव शेतकी संघाचे व्यवस्थापक अवधूत देशमुख यांनी केले आहे.

Protected Content