Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी होणार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्र सरकारनं थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी झाला होता. केंद्र सरकारकडून आज दुपारी नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली जाणार आहे. पराक्रम दिवस साजरा करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आणि कार्यपद्धती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाांचा शुभारंभ २३ जानेवारीला कोलकाता येथील ऐतिहासिक ‘विक्टोरिया मेमोरियल हॉल’ येथून करतील. कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा कोलकात्याच्या दौऱ्यावर असतील. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी चित्रा घोष यांच्या निधनावर आदरांजली अर्पण केली होती.

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या वर्षानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन केली होती. त्यात इतिहास अभ्यासक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या परिवारातील सदस्य आणि आझाद हिंद सेनेतील काही सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. नवी दिल्ली, कोलकाता आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित ठिकाणी जंयतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे.

Exit mobile version