Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नूतन मराठा महाविद्यालयात भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह हृदय सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पालकांचा भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला होता.

मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख तर प्रमुख पाहुणे लेफ्टनंट राहुल पाटील उपस्थित होते. यावेळी प्रस्तावनेत एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

यावेळी चाळीसगाव येथील रहिवासी शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लेफ्टनंट राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

आयुष्यात जिद्द ठेवली तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर प्रवीण धीमान यांनी केले. पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान या विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी तर आभार लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला कॅप्टन कमल पाटील, लेफ्टनंट योगेश बोरसे, प्रा डॉ.राहूल संदनशिव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version