Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नूतन मराठा महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलेचा सन्मान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, मराठी विभाग आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

 

पहिल्या सत्रात महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कबचौ विद्यापीठाच्या सिनेट सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथी शिकलेल्या परंतु अगदी यशस्वीपणे व्यवसाय सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान महिला वैशाली सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महिला अधिकारी तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर आणि विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. जे. पी. सोनटक्के आणि इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ इंदिरा पाटील उपस्थित होत्या.

 

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय रुपाली पाटील या विद्यार्थीनीने करुन दिला. जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी आणि आयोजनामागील भुमिका प्रा ललिता हिंगोणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केली. अनुश्री रत्नाकर कोळी या विद्यार्थीनीने एक स्रीवादी जाणिवेची कविता सादर केली. सत्कारमुर्ती वैशाली पाटील यांनी आपल्या व्यवसायातील संघर्षातून कसे यश संपादन केले याबद्दल थोडक्यात संवाद साधला.

 

प्रा. डॉ. सुरेखा पालवे म्हणाल्या की, स्रीयांची ओळख प्रेम,ममता, मांगल्य आणि वात्सल्यच नाही तर ती समाजाचा केंद्रबिंदू आहे. ती समाजाची दिशादर्शक आहे.जिजाऊ माता, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सिंधूताई सपकाळ अशा कितीतरी कर्तृत्ववान महिलांनी आपल्या जिवाचं रान केलं.  म्हणूनच आजची स्री सन्मानाने जगत आहे असेहि त्या म्हणाल्या.

 

दुसऱ्या सत्रात युवती सभेच्या विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभुषेत “मी सावित्रीबाई बोलतेय” अशी सुरुवात करुन उपस्थितांशी संवाद साधला. सुरुवातीला श्रीकांत रंगुबाई लासुरकर याने एक स्वरचित कविता आणि महिला दिनविशेषपर मनोगत व्यक्त केले. प्राप्ती पवार,अश्विनी थोरात, समृद्धी देशपांडे, सारिका कदम, वैष्णवी तावडे,प्रेरणा धनगर, कामिनी पाटील इ विद्यार्थिनींनी, सुषमा स्वराज, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ अशा विविध कर्तबगार महिलांच्या वेशभुषेत साभिनय संवाद साधला.

 

दोन्ही सत्राच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्या माधुरी पाटील यांनी एकंदरीत यशस्वीपणे पार पडलेल्या कार्यक्रमावर उत्स्फूर्त नोंदवत अध्यक्षीय समारोप केला.

सुत्रसंचलन प्रा वंदना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा प्रियंका हिवरकर यांनी केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे बहूसंख्य विद्यार्थीनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

Exit mobile version