Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नूतन मराठा महाविद्यालयात ईद मिलनचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालयात उर्दू विभागातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक सद्भावनाचे प्रतीक म्हणून ईद मिलन चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

 

ईद मिलन प्रसंगी ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अ.करीम सालार, एच. जे. थीम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. इक्बाल शहा, ए. टी. एम. संस्थेचे अध्यक्ष एजाज अ. गफ्फार मलिक, कार्यक्रमाचे आयोजक तथा उर्दू विभागाचे प्रा. डॉ. आफाक शेख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, अनिस शेख, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांच्या परिचय उर्दू विभागाचे प्रा अनिस शेख यांनी करुन दिला. प्रास्तविक डॉ. आफाक शेख यांनी केले. रफीक पटवे यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे नातं सांगणारी गजलसम्राट सुरेश भट यांनी लिहिलेली नात अर्थात “जगातल्या दीनदुख्खीतांचा अखेरचा आसरा मोहम्मद” ही कविता आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. आजचा ईदमिलन चा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता चे प्रतीक आणि ही राष्ट्रीय एकात्मता गेल्या विस पंचवीस वर्षांपासून नूतन मराठा महाविद्यालय जोपासत असल्याचं प्रतिपादन डॉ. इकबाल शाह यांनी केले. हिंदू धर्म गीतेवर, ईस्लाम कुराणवर आणि ख्रिचन धर्म बायबलवर चालतो पण हिंदूस्थान संविधानावर चालतो म्हणून आपण सारे संविधानाचे पाईक झाले पाहिजे तेव्हाच राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहील असे प्रतिपादन एजाज मलिक यांनी केले. अफजलखान मुसलमानांचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचाच आहे असे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही समाज विघातक प्रवृत्ती करताना दिसतात परंतु अफजलखान नुसता नावाचा मुसलमान होता परंतु सर्व जाती धर्मातील व तळागाळातील लोकांप्रती सद्भावणेने वागणारा जाणता राजा शिवाजी महाराज आम्हाला जवळचा वाटतो हा खरा इतिहास आहे तेव्हा गैरसमज पसरवणाऱ्यांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी असे इदमिलन किंवा दसरा निमित्ताने गळाभेट या सारखे कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने घेतले पाहिजेत असे आवाहन डॉ अ. करीम सालार यांनी केले.
आजपर्यंतच्या इतिहासात नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात किंवा नूतन परिवारात एकही जातीय किंवा धार्मिक कलह निर्माण करणारी घटना घडली नाही. याचे श्रेय ईदमिलन सारख्या सामाजिक सद्भावना आणि जातिय सलोखा राखणाऱ्या कार्यक्रमांना जाते असे सांगत सगळ्यांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उर्दू विभाग यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version