Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानग्रस्त जनतेला मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल – आमदार किशोर पाटील

पाचोरा, प्रतिनिधी | कोकणच्या धर्तीवर आपल्या शेतकरी बांधवांना मदत मिळावी, यासाठी मी शासनाकडे आग्रही असल्याचेही प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी केले. ते अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

 

बैठकीत आ. किशोर पाटील पुढे म्हणले की, सततच्या पावसामुळे शेतकरी राजा आधीच अडचणीमध्ये सापडला असून खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगाम तरी हातचा जाऊ नये, पिके वाचली पाहिजेत यासाठी मतदार संघातील सर्व नाला बांध, बंधारे आदींच्या दुरुस्तीसाठीचे अंदाज पत्रके व सर्व अनुषंगिक माहिती  तातडीने द्या जेणेकरून शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून जनतेला दिलासा देण्याचा माझा प्रयत्न आहे. मागील पंधरवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका व परिसरात  झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेती, रस्ते, पूल बंधारे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले होत्या. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. २४ रोजी सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी दालनात घेतली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद , जलसंधारण, जलसंपदा, विज वितरण कंपनी, पंचायत समिती, नगरपालिका, वनविभाग, पिकविमा आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरदेवळा पूल, कजगाव पूल, नेरी घुसर्दी, दिघी खाजोळा, कजगाव, वडगाव मुलाने, बाळद, सामनेर, नांद्राआदी ठिकाणी झालेल्या  नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेत कोणीही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, दोन्ही तालुक्याचे कृषी अधिकारी, पिक विमा कंपनीचे अधिकारी तसेच जलसंधारण, जलसंपदा, जिल्हा परिषद, विज वितरण कंपनी, वनविभाग यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे उपस्थित होते.

Exit mobile version