Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत , तांत्रिक अडचणी येणार नाही ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

 

रत्नागिरी : वृत्तसंस्था । सरकार म्हणून जे आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल.  कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरचा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं

 

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मी एवढच सांगतो आहे की, सुरूवातीला आम्ही तातडीची मदत करतच आहोत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. काही ठिकाणी रस्ते, पूल देखील वाहून गेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे आणखी काही नुकसान झालं असेल, या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन, आपण जे करता येणं शक्य आहे व जे करणं आवश्यक आहे ते सर्व करू.

 

मदत पुरवठ्यात तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाही. त्याही बाबत मी सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी विम्याचं कवच घेतलेलं असेल, त्यांची एक वर्गवारी करा आणि ज्यांनी विमा घेतलेला नाही, त्यांची वेगळी वर्गवारी करा. तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही, याची खबरदारी सरकार घेईल असेही ते म्हणाले .

 

Exit mobile version