Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नीरव मोदीच्या भावाकडून अमेरिकन हिरे कंपनीची कोट्यवधींची फसवणूक

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीविरोधात अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहल मोदीने मॅनहॅटन येथील एका हिरे कंपनीसोबत मल्टी लेयर्ड स्कीमच्या माध्यमातून १९ कोटींपेक्षाही अधिक रक्कमेत हेराफेरी केल्याचा आरोप आला आहे.

हिऱ्यांच्या या कंपनीने नेहलवर २.६ दशलक्ष डॉलरहून अधिक मुल्यांचे हिरे खरेदी केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ‘फर्स्ट डिग्री’ अंतर्गत चोरीचा आरोप लावला आहे.

अमेरिकन कायद्यानुसार, एक दशलक्षाहून अधिक रक्कमेची चोरी, फसवणूक असेल तर फर्स्ट डिग्रीमध्ये गुन्हा नोंदवला जातो. मॅनहॅटन डिस्ट्रीक्ट अॅटर्नी सीव्हाय वेन्स ज्युनिअर यांनी सांगितले की, नेहल मोदीवर न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टात फर्स्ट डिग्रीमध्ये मोठ्या चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे आता नेहल मोदीवर न्यूयॉर्कमध्ये सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे नेहल मोदीच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जाते.

कोर्टाला सोपवण्यात आलेल्या माहितीनुसार, नेहल टायटन होल्डिंग्सचे माजी सदस्य नेहल मोदीने मार्च ते ऑगस्ट २०१५ दरम्यान, एका कंपनीसोबत खोटे सादरीकरण करण्यासाठी जवळपास २.६ दशलक्ष किंमतीचे हिरे एलएलडी डायमंड्सकडून घेतले होते. नेहलला सुरुवातीला एक मोठा व्यावसायिक म्हणून एलएलडी डायमंड्सचा अध्यक्ष म्हणून ओळख करून देण्यात आली होती.

मार्च २०१५ मध्ये नेहल मोदी एलएलडी कंपनीकडे गेला आणि कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनसोबत भागिदारी करत असल्याचे सांगितले. नेहलने न्यूयॉर्कमधील एलएलडी कंपनीला आपल्या काही हिऱ्यांची आवश्यकता असून कॉस्टकोला विक्री करण्यासाठी काही नमुने दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कंपनीने नेहलकडे हिरे सोपवले. यानंतर नेहलने कॉस्टको हिरे खरेदी करण्यास तयार असल्याचे एलएलडी कंपनीला सांगितले.

मात्र, आपल्यासोबत फसवणूक झाली असल्याचे कंपनीला समजल्यानंतर त्यांनी तातडीने पैसे देण्यास अथवा हिरे पुन्हा देण्याची मागणी केली. मात्र, नेहालने हे हिरे परस्पर विकले होते. त्यानंतर नेहलविरोधात कंपनीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Exit mobile version