Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नीरव मोदीची लंडन, यूएईमधील ३३० कोटीची संपत्ती जप्त !

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे.

 

 

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी या दोघांची जवळपास १३५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. गेल्या महिन्यात ‘ईडी’ने ही कारवाई केली होती. या संपत्तीमध्ये २३०० किलो पॉलिश हिरे, मोती आणि दागिन्यांचा समावेश आहे. नीरव आणि मेहुलने कथितरित्या हे हिरे-दागिने हाँगकाँगला पाठवले होते. तिथून हे भारतात परत आणण्यात आले आहेत. दरम्यान, मोदीच्या मुंबईच्या वरळी भागातील ‘समुद्र महाल’ इमारतीमधील फ्लॅट, अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरील फार्म हाऊस, राजस्थानमधील जैसलमेरमधील मॉल, लंडन-यूएईमधील फ्लॅट्स ताज्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले आहेत. आता आठ जूनला मुंबईतील विशेष न्यायालयाने ईडीला नीरव मोदीची लंडन, यूएईमधील संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. मागच्यावर्षी पाच डिसेंबरला याच कोर्टाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. त्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २,३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Exit mobile version