निसर्ग आणि मानवतेचे शोषण करून साधलेला विकास शाश्वत नसतोच

अहमदनगर: वृत्तसंस्था । ‘निसर्ग शोषण करून साधलेला विकास शाश्वत नव्हे तर केवळ फुगवटा असतो. स्मार्ट सिटी नव्हे तर समृद्ध खेडीच देशाला तारतील महात्मा गांधींनी हाच संदेश दिला होता, मात्र आपण विसरलो. कोरोनाने पुन्हा त्याची जाणीव करून दिली ,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले .

गांधी जयंतीनिमित्त तरुणांना उद्देशून हजारे यांनी व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. विकास आणि खेडी व तरुणांचे योगदान याबद्दल हजारे यांनी भाष्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारने खेड्यांकडे दुर्लक्ष करून शहरेच वाढविली. त्यातूनच स्मार्ट सिटी संकल्पना आली. शहरीकरणाच्या नादात कोट्यवधी टन इंधन जाळतो आहोत. त्यातून तापमानवाढ होऊन प्रदूषणही झाले. आतापर्यंत न ऐकलेल्या रोगांच्या साथी येत आहेत. निसर्ग आणि मानवतेचे शोषण करून साधलेला विकास शाश्वत नसतो. खेड्यांमधील विकास हा तेथील साधनसामुग्रीचा वापर करून होतो. याचे उदाहरण आम्ही राळेगणसिद्धीत दाखवून दिले आहे.’

‘वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता. मात्र, गांधीजींचे विचार वाचण्यात आले आणि आत्महत्येचा विचार सोडून कामाला सुरुवात केली. आज ८३ व्या वर्षीही तेच विचार घेऊन पुढे जात आहे. अहिंसेच्या मार्गाने विकास साधता येतो. त्यासाठी लोकांचे प्रबोधन करायला हवे. प्रबोधन करणाऱ्याच्या शब्दाला वजन हवे, तरच लोक ऐकतात. चारित्र्य, आचार, विचार शुद्ध हवेत. पोकळ भाषणबाजीने काम होत नाही. लोक भाषणे ऐकतात. मात्र, भाषण देणारा कोण आहे, कोठे राहतो, कसा रहातो, त्याचे चारित्र्य कसे आहे, याचा विचार करतात. त्यावरून त्याचे ऐकायचे की नाही, हे ठरवितात. पोकळ भाषणबाजी करणारे खूप झालेत. लोक त्यांचे ऐकत नाहीत. त्यांना स्वत:लाही सतत अपराधीपणा जाणवत असतो. वाईट कामांचे विचार मनात असल्याने रात्री गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. अशी मंडळी प्रबोधन करू शकत नाहीत.’

हजारे पुढे म्हणाले, ‘खेड्यांचे महत्त्व आता कोरोनाने पुन्हा दाखवून दिले आहे. लोकांचे लोंढेच्या लोंढे शहरे सोडून गावाकडे धावत होते. शेकडो किलोमीटर पायपीट करत गाव जवळ करीत होते. सुरुवातीपासून खेड्यांकडे लक्ष दिले असते, तर या लोकांवर ही वेळ आली नसती. आता तरी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपला देश तरुणांचा आहे. त्यांनी यावर जरूर विचार करावा. यासाठी माझ्यासारखे लग्न करू नका, असे मी सांगणार नाही. लग्न करा, संसार करा, पण गाव, समाज आणि देशाचाही विचार करा. करोडपती व्हा, पण आपले मूळ कर्तव्य विसरू नका,’ असाही संदेश हजारे यांनी दिला आहे.

Protected Content