Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निसर्गाचा आदर करा ही बुद्धांची शिकवण – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गौतम बुद्धांनी निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावर आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे .

कोरोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत असंही ते म्हणाले .

बुद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मानले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “गौतम बुद्ध यांचं जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेलं होतं. पण आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं गरजेचं आहे”.

“कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनानंतरचं जग आत्तासारखं अजिबात नसेल. आगामी काळात कोरोनाआधी आणि कोरोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आता आपल्याला कोरोनाची चांगली ओळख झाली असून त्याच्याविरोधाच लढण्याचं धोरण आखू शकतो. आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. वर्षभरात लस येणं हा मानवी दृढनिश्चय दाखवतं. भारताला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, ज्यांनी लसनिर्मितीसाठी काम केलं,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.

 

Exit mobile version