Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूक लढवणार नसले तरी शिवसेनेचा ममतांना पाठिंबा

 

मुंबई : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्या थेट लढत दिसत आहे. विधानसभेची निवडणूक लढवणार नसले तरी ममतांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे

 

 

दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी बांधली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेनाही उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला. शिवसेनेनं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं.

 

“शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार की नाही? हे जाणून घेण्याबद्दल असंख्य लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर याठिकाणी माहिती देत आहे. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बघितली तर असं दिसतंय की, दीदी विरुद्ध सर्व अशीच लढाई दिसत आहे. सर्व ‘एम’ म्हणजे मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदीविरुद्ध वापरलं जात आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही आणि ममतांना समर्थन असेल. आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत, यावर आमचा विश्वास आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरून राऊत यांनी पोस्ट अप्रत्यक्षपणे मोदींवरही निशाणा साधल्याचं दिसत आहे. राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दीदींविरुद्ध सर्व ‘एम’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मनी, मसल आणि मीडिया यांच्याबरोबरच एम म्हणजे मोदी असाही अर्थ काढला जात आहे.

Exit mobile version