Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूक जाहीरनाम्यातच डेटिंग डेस्टिनेशन निर्मितीच आश्वासन !!

 

वडोदरा : वृत्तसंस्था । गुजरातमधील  वडोदरातील निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात युवकांना  आकर्षित करण्यासाठी थेट डेटिंग डेस्टिनेशन बनवण्याचं आश्वासन देऊन टाकलंय. त्यामुळे वडोदराचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

 

काँग्रेसच्या आश्वासनावर भाजपनं सडकून टीका केली आहे. जसे संस्कार तसंच काँग्रेसचं हे आश्वासन असल्याचा टोला भाजपनं लगावला आहे.

 

गुजरातमध्ये ६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. आज काँग्रेसने वडोदरा महापालिका निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात काँग्रेसनं युवकांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या आश्वासनामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय की, जर काँग्रेस सत्तेत आली तर डेटिंग डेस्टिनेशन तयार केले जातील. वडोदरा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पटेल यांनी म्हटलं आहे की, ‘युवकांनाही आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. जे कँफे सेंटर होते ते सरकारने बंद केले आहेत. तसंही श्रीमंत मुलंच कॅफे सेंटरमध्ये जाऊ शकतात. गरीब आणि मध्यमवर्गातील मुळं कुठे जाणार? त्यामुळेच आम्ही सत्तेत आल्यास गरीब मुलांसाठी अशी जागा तयार करु जिथे ते आरामात बसू शकतील’.

 

 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या आश्वासनावर भाजपनं चांगलंच तोंडसुख घेतलंय. काँग्रेसवर जसे संस्कार झाले आहेत, त्या प्रमाणेच त्यांनी हे आश्वासन दिलं आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केलीय. वडोदरा हे एक संस्कारी शहर आहे. इथं भाजपनं अनेक बाग फुलवल्या. त्यात लोकांचा फिटनेस आणि मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केली आहे. पण काँग्रेसनं हे आश्वासन राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतरच दिलं असेल, असा टोलाही भाजपनं लगावला आहे.

Exit mobile version