Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निलेश राणेंवर उदय सामंत खवळले

 

मुंबई : वृत्तसंस्था । मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली असे सांगणारी दखल घेण्याचीही मला गरज वाटत नाही , मी बोलत नाही म्हणजे घाबरतो असेही नाही , असे प्रत्युत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिले आहे

माजी खासदार निलेश राणे यांनीट्विट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला. राणे यांच्या ट्विटनंतर गुप्त बैठक नेमकी कशा संदर्भात झाली आणि उदय सामंत आणि फडणवीस यांच्यात काय खलबतं झाली, अशी चर्चा सुरू झाली. त्यावरून वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या. अखेर उदय सामंत यांनी मौन सोडलं. सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत निलेश राणे यांना उत्तर दिलं.

उदय सामंत म्हणाले, “माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली, हे कुणी सांगितलंय… ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं. कोकणातील जनतेनं नाकारलं आहे. त्यांनी माझं राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त बैठक झाली. राजकीय खलबतं झाली, अशा प्रकारचं ट्विट करणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. भेट झाली. कुठे झाली. बंद खोलीत झाली, अशा प्रकारच्या बातम्या मी ऐकतो आहे. मी त्यांच्या आरोपांवर कधीही मी बोलत नाही, कारण जनतेचं त्यांची दखल घेतलेली नाही, तर माझ्यासारख्या मंत्र्यानं का घ्यावी?

आता मुद्दा गुप्त बैठकीचा. गुप्त बैठक करायचीच होती, तर मतदारसंघात कशाला करू. रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवर दोनशे लोकांच्या समोर कशाला करू? गुप्त बैठक करायची असेल, तर नागपूर, मुंबई, चेन्नई हैदराबाद अशा शहरात जाऊन गुप्त बैठक करेल ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची ट्विट करून उद्धव ठाकरे यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल, अशा भ्रमात जर कुणी असेल, तर हा बालिशपणाच आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मी टाळतो. घाबरतो असं नाही, पण कुणाबद्दल बोलावं.

“बैठकीबद्दल सांगायचं, तर ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली. पहाटे शपथविधी झाला आणि सकाळी गौप्यस्फोट झाला, तर मी त्याला गौप्यस्फोट समजू शकतो. पण सहा दिवसांपूर्वी मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर १ वाजता पोहोचलो. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी आले. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे, जी आम्हाला शिकवली गेली. त्याप्रमाणे मी त्यांचं स्वागत केलं. त्यात काही पाप केलं नाही. मी एकटा कुणाला भेटलो नाही. ज्यांनी कुणी आरोप केलाय, ते खूप मागे उभे होते. तिथे प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड होते आणि त्यानंतर ते (निलेश राणे) होते. त्यामुळे कदाचित बघण्यात फरक होऊ शकतो. पण फडणवीस माझ्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना भेटलो असेल, मी गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. पण मला देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांना मित्र म्हणून सल्ला द्यायचा की, अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्यांना जर आपण सोबत ठेवणार असाल, तर भविष्यातील महाराष्ट्राचं राजकारण काय असू शकतं याची प्रचित सगळ्यांना आली असेल,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

 

Exit mobile version