Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निलेश राणेंनी आधी आपला इतिहास अभ्यासावा- निलेश चौधरी

 

धरणगाव प्रतिनिधी । ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करण्याआधी निलेश राणे यांनी  आपला इतिहास  तपासावा असा टोला मारत येथील नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

 

निलेश राणे यांनी नुकत्याच जळगावच्या दौर्‍यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. याला धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी  प्रत्युत्तर दिले आहे.  त्यांनी म्हटले आहे की,  ना.गुलाबरावांना चोर म्हणणार्‍या निलेश राणेंनी आधी आपला इतिहास अभ्यासावा. कोकणातील हर्‍या आणि नार्‍या टोळीतील नार्‍याचा उध्दार स्व.बाळासाहेबांनी केला. त्यांच्या पुण्याईवरच नार्‍याचा नारायणराव झालेल्या व्यक्तीला महाराष्ट्राचे मुखमंत्रीपद मिळाले. मात्र, स्वार्थाने आंधळे झालेल्यांनी सत्तेसाठी गद्दारी केली हा इतिहास आहे. आता या गद्दाराच्या कर्तृत्वावर मोठी झालेली मुले शिवसेनेवर उठसूट हल्ला करून आपली राजकीय सोय लावून घेत आहेत. ना.गुलाबरावांची औकात काढणार्‍या निलेश राणेंची स्वत:ची औकात काय आहे? हे त्यांनीच पहावे.

 

निलेश चौधरी यांनी  पुढे म्हटले आहे की, ना.गुलाबराव काय आहेत हे खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेब, शिवसेना आणि शिवसैनिकांवरील अढळ निष्ठा, नागरिकांची सेवा आणि पारदर्शी जिवन हीच ना.पाटील यांची ओळख आहे. गुलाबभाऊंनी राणे कुटूंबियांप्रमाणे वैद्यकिय महाविद्यालय, विद्यापिठ आणले नसतील. मात्र, कुणाची हत्या करण्याचे पातक त्यांनी केलेले नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. निलेश राणे यांनी ना.गुलाबरावांवर केलेली टिका ही वैफल्यातून होती हे त्यांच्या बोलण्यातूनच दिसत होते. राणे कुटूंबिय हे शिवसेना विरोधासाठीच ओळखले जाते. भाजपाचे स्थानिक नेतेही त्यांच्या मताशी सहमत नसतील. गुलाबभाऊ म्हणजे खुली किताब आहेत. त्यांच्यावर टिका करतांना निलेश राणे यांनी शब्द जपून वापरायला हवे होते. गुलाबरावांचे नाव कुणी ठेवले याचा शोध घेणार असल्याचे म्हणणार्‍या राणेंनी पुन्हा जळगावात येवून अशी भाषा वापरली तर शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखविल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही  निवेदनात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिला आहे.

 

Exit mobile version