Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भयातील दोषींना माफ करा – जयसिंह यांचे आवाहन; आशादेवी भडकल्या

nirbhaya mother

नवी दिल्ली प्रतिनिधी । निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींना फाशीच्या शिक्षेची नवीन तारीख जाहीर झाली आहे. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दोषींना माफ करण्याचे आवाहन केले असून यावर आशादेवींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहेत, ‘मला सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत ? संपूर्ण देश दोषींना फाशी देऊ इच्छितो. देवाने जरी मला सांगितले तरी मी त्यांना माफ करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

इंदिरा जयसिंह यांनी टि्वट करत आवाहन केले. दिल्लीच्या एका न्यायालयाने चार दोषींना फाशीची तारीख बदलली. तेव्हाच निर्भयाची आई आशादेवी यांनी निराशा जाहीर केली होती. त्यानंतर वकील इंदिरा जयसिंह यांनी हे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर इंदिरा जयसिंह यांनी एक ट्विट केलं आहे. ‘आशा देवींचं दु:ख आणि वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचं अनुकरण करायला सांगेन. सोनियांनी ज्याप्रमाणे त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केलं आणि आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचं सांगितलं होतं, तोच कित्ता आशा देवी यांनी गिरवावा,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आम्ही आशा देवी यांच्या सोबत आहोत, मात्र मृत्युदंडाच्या विरोधात आहोत,’ असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

यावर आशादेवी म्हणाल्या की, मला विश्वास बसत नाही की असा सल्ला देण्याची इंदिरा जयसिंह यांनी हिंमतच कशी केली. गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात त्यांची अनेकवेळा भेट झाली. पण एकदाही त्यांनी आमच्याविषयी चौकशी केली नाही आणि आज त्या दोषींसाठी बोलत आहेत. असे लोक बलात्काऱ्यांचे समर्थन करुन आपली उपजिविका सुरु ठेवतात. त्यामुळेच बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत.

Exit mobile version