Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशी : रात्रभर कोर्टात घडल्या नाट्यमय घटना

नवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील आरोपींनी आपली फाशी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुनावणी झाल्यानंतर या चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले.

निर्भयावर अत्याचार करून तिला अतिशय क्रूरपणे हत्या करणार्‍या मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंग या चारही आरोपींना फाशी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. काल सायंकाळीच या चौघांचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. येथे आरोपींच्या वकिलाने कोरोनामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र रात्री बाराच्या सुमारास उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. यानंतर दोषींच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टानेही हा दुर्मीळ खटला असल्याने दीड वाजेला या प्रकरणावर सुनावणी सुरू केली. यात वकिलांनी राष्ट्रपदीच्या दयेच्या याचिकेबाबत प्रश्‍न उपस्थित केला. मात्र न्यायाधिशांनी याला अमान्य केले. अखेर साडे तीन वाजता दोषींचा दावा फेटाळून लावण्यात आल्याने त्यांना फाशी होणारच असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, रात्रभर दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही चौघे नराधम आपली फाशी टाळू शकले नाहीत.

Exit mobile version