Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निधी परत जाऊ नये म्हणून कार्यालयात लगबग

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – आर्थिक वर्ष संपत असल्याने विविध शासकीय विभागांसह महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून थकबाकी वसुलीबरोबर विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी माघारी जाऊ नये म्हणून खर्च करण्याची एकच लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे, आगामी दोन तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असून दिवसाचे २४ तास वेळ अपूर्ण पडत आहेत. आर्थिक व्यवहार खोळंबून राहू नयेत यासाठी ३१ मार्च रोजी शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकांच्या शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आले आहेत.
मार्च अखेर आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास केवळ दीड दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे विकासकामे, शासकीय योजनांसाठी प्राप्त निधी, कार्यालयीन खर्च व तत्सम बाबींची देयके, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर करून घेण्याकरिता शासकीय कार्यालयांमध्ये लगबग सुरू आहे. या आर्थिक वर्षांत काही काळ संसर्ग प्रादुर्भाव निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सुरुवातीचे काही एक दोन महिने शासकीय योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण कमी असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून निष्पन्न झाले होते. ३१ मार्चपूर्वी उपरोक्त निधीचा विनियोग न झाल्यास तो परत जातो. गेल्या दोन वर्षापासून विकास निधीची अडचण असताना मिळालेला निधी परत जाणे संबंधित विभागासाठी नामुष्कीची बाब आहे . ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून शासकीय विभाग झटून कामाला लागले आहेत. ३१ मार्च अगोदरच निधीचा विनियोग करण्यावर त्यांचे लक्ष आहे. मार्चअखेरची एकंदर स्थिती लक्षात घेऊन लेखा आणि कोषागार शाखेने शासकीय विभागांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य लेखा व कोषागार विभागासह १५ तालुक्यांमधील उपलेखा व कोषागार कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत.
लेखा व कोषागार विभागाने शासकीय, निमशासकीय अशी विभागांची चालू आर्थिक वर्षांत देयके मंजूर केल्याचे सांगितले जाते मार्चअखेपर्यंत ही आकडेवारी काही हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था थकबाकी वसुलीत गुंतल्या आहेत. महापालिकेने थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला असून तिजोरीत शक्य तितकी भर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या आर्थिक वर्षांत रेडिरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी दस्तनोंदणीचा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुद्रांक कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे.

शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री १२ वाजेपर्यंत कामकाज  शक्यता
आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचा नेहमीचा कार्यालयीन वेळ पुरेसा नसल्याने या दिवशी एसबीआयची कोषागार शाखा, व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँकेच्या शाखा, कार्यालये रात्री १२ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षांच्या अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयांकडून वितरित होणारी देयके, धनादेश स्टेट बँकेत वटवून रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री १२ वाजेपर्यंत कामकाज निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version