Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निंभोरा पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई

 

रावेर, प्रतिनिधी  । तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी अवैध धद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली असून शनिवारी पाच जणांवर अवैध धंदे केल्याने कारवाई केली आहे.  तीन जणांनी बेकायदेशीर दारूची विक्री  तर दोघांवर सट्टा खेळविल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात एकूण १३७१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे कार्यक्षेत्रातील गावांत वारंवार भेटी देऊन पाहणी करीत आहेत. दरम्यान निंभोरा, खिर्डी व ऐनपूर येथे बेकायदेशीररीत्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती उनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार ऐनपूर-खिर्डी रस्त्यावरील संकेत ढाब्याजवळ मधुकर प्रभाकर ठाकूर (रा. खिर्डी) हा विना परवाना देशी विदेशी दारू विकताना आढळुन आला. त्याच्याकडून ६९२२ रुपयांची दारू जप्त केली आहे. तर याच रस्त्यावर ब्रम्ह ढाब्याच्या आडोशाला ब्राह्मनंद छगन जैस्वाल (रा. खिर्डी) याच्याकडे ३३३० रुपयांची विदेशी दारूची विक्री करतांना आढळून आला आहे. खिर्डी गावातील भाऊ ढाब्याजवळ चंद्रकांत जयराम कोळी (रा. जळगाव ह. मु. वाघाडी) हा २६६५ रुपये किमतीची विदेशी दारूची चोरट्या पद्धतीने विक्री करतांना आढळून आला आहे. बेकायदेशीररीत्या देशीविदेशी दारूची चोरटी विक्री केल्याप्रकरणी या तिघाविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खिर्डीत सट्टावर कारवाई

खिर्डी येथे सार्वजनिक जागी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा सट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आल्याने राहुल सुरेश बारी व आनंदा पंडीत कोचूर दोन्ही रा खिर्डी यांना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले आहे. यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून ८०० रुपये रोख व सट्टाचे सहित पोलिसांनी जप्त केले आहे. अवैध दारू विक्री व सट्टावरील दोन्ही कारवाई एपी5 स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हवालदार राकेश वराडे, ज्ञानेश्वर चौधरी,गणेश सूर्यवंशी, ईश्वर चव्हाण, स्वप्नील पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version