Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजप महिला आघाडीची निदर्शने

जळगाव प्रतिनिधी । राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप महिला आघाडीचे निवेदन न स्वीकारता पळपुटेपणा केला असल्याचा आरोप करत भाजपच्या महिला आघाडीतर्फे निदर्शने करून ना. ठाकूर यांचा निषेध करण्यात आला.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या आहेत. या दौर्‍याच्या सुरुवातीला यशोमती ठाकूर जिल्हा परिषदेत आढावा बैठकीसाठी आल्या आहेत. दरम्यान, ठाकूर यांच्या आगमनावेळी भाजप महिला आघाडीच्या काही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यातील महिलांवर होणार्‍या अत्याचारासंदर्भात त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, भेट नाकारल्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात युवती तसेच महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विषयासंदर्भात मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यासाठी भाजपच्या महापौर भारती सोनवणे, महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह काही कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या आवारात आलेल्या होत्या. परंतु, मंत्री यशोमती ठाकूर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना न भेटताच आढावा बैठकीसाठी निघून गेल्या. त्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेश द्वारावरच रोखून धरले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तेथेच निदर्शने करायला सुरुवात केली.

Exit mobile version