नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी — मोदी

 

नाशिक :  वृत्तसंस्था ।  महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने ऑक्सिजनवरच्या २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्याप्रती ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

“ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने मन हेलावलं. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांचं सांत्वन”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दुर्घटनेत दगावलेल्या नागरिकांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

 

नाशिक शहरात महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.  हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेले. यावेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला  ही गळती रोखण्यास यश आले. या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला  या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Protected Content