नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेस नेतेच बेजार

 

मुंबई  : वृत्तसंस्था । मुख्यमंत्री व गृहमंत्री पाळत ठेवत असल्याचे विधान करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षाकडून कानउघाडणी झाल्यावर त्यांनी भूमिका बदलली. मात्र त्यांच्या वक्तव्यांनी काँग्रेस नेते अस्वस्थ झाले आहेत.

 

आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा पटोले यांनी दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादीत प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या हालचालींवर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत केले. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असताना स्वपक्षाच्या सरकारवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्याने त्याची साहजिकच प्रतिक्रिया उमटली. भाजपला तर आयतीच संधी मिळाली. पटोले यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ‘ नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी काय प्रतिक्रिया व्यक्त करणार, असा  सवाल करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना अजिबात किंमत देत नाही हेच सूचित केले.

 

राजकीय घडमोडींची पोलीस माहिती घेतात, ती मुख्यमंत्र्यांना दिली जाते, याबद्दल पटोले यांना कल्पना नसल्यास त्यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माहिती घ्यावी, असा उपरोधीक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते  नवाब मलिक यांनी दिला. लोणावळा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना नाना पटोले यांनी आपल्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत व त्याची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रयांना दिली जात असल्याचे वक्तव्य केले. त्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात नवाब मलिक यांनी पटोले यांच्या या विधानाचा समाचार घेतला.

 

Protected Content