Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊंनी जामनेरला जाणे टाळले

जळगाव : प्रतिनिधी । गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताणली गेलेली फडणवीस- खडसेंच्या संभाव्य भेटीची उत्सुकता आज संपली.. जामनेरला हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी येणाऱ्या फडणवीस व खडसेंची भेट अखेर होणार नाही, हे स्पष्ट झाले.

पक्षात अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत खडसेंनी यामागे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचेच षडयंत्र असल्याचा आरोप गेल्या महिन्यात केला. तेव्हापासून खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरु झाली. गेल्या आठवड्यातच त्यांनी मुंबई वारी केल्यानंतर ही चर्चा तीव्र झाली आहे.

दुसरीकडे या वातावरणात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते होत असून महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्याठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता लागून होती. खडसेंनी मात्र, मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले व ही संभाव्य बहुचर्चित भेट अखेर झालीच नाही.

खडसे प्रत्यक्ष गेले नसले तरी त्यांनी महाजनांना फोन करुन या प्रकल्पाबाबत शुभेच्छा दिल्या. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपने आज मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. जळगाव जिल्ह्यातही प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन झाले. मुक्ताईनगर तालुक्यात कोथळीच्या जुन्या मंदिरस्थळी भाजपने खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. मात्र, खडसे व त्यांच्या समर्थकांनी त्याकडे पाठ फिरवली. अवघ्या पाचच मिनिटात हे आंदोलन आटोपले.

Exit mobile version