Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नागपूरमध्ये रुग्णालयाला आग ; तीन रुग्णांचा मृत्यू

 

 

नागपूर : वृत्तसंस्था । शहरात शुक्रवारी वाडी परिसरातील डॉ. राहुल ठवरे यांच्या वेलट्रिट रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षाला आग लागली. या आगीत तीन रुग्णांचा मृत्यू झाला,  दोन रुग्ण होरपळले आहेत.

 

सहा रुग्णांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यानं त्यांचे प्राण वाचले. मृतांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. रुग्णालयात एकूण ३१ रुग्ण दाखल होते. रुग्णांना बाहेर काढताना रुग्णालयातील तीन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

वाडी परिसरात डॉ. राहुल ठवरे यांचं चार मजली रुग्णालय असून, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रुग्णालय आहे. दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग आहे. या विभागात १० रुग्ण होते. अतिदक्षता विभागातील वातानुकूलन यंत्रात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर सहा रुग्ण स्वतःहून बाहेर आले. परंतु, जे तीन रुग्ण गंभीर होते त्यांना बेडवरून हलता आले नाही. यात एकाचा घटनास्थळीच, तर दोघांचा दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. या रुग्णालयात संध्याकाळी ६ वाजताच दगावलेल्या एका रुग्णाचा मृतदेहही या घटनेत जळाला आहे.

 

या रुग्णालयात १८ ते २० कर्मचारी असून, त्यात तीन डॉक्टर आहेत. दुसऱ्या मजल्यावर १० रुग्ण तर तिसऱ्या मजल्यावर १७ बेड असून, त्यातील सर्व रुग्ण सुखरू आहेत. दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात जे सहा रुग्ण बाहेर काढण्यात आले त्यांना मेडिकल मेयोसह दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्तांसह महापालिकेचे अधिकारीही पोहोचले.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्रे फडणवीस यांनी आमदार समीर मेघे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना मदत करण्याची सूचना केली. फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क करून त्यांनाही सूचना केल्या. दुसरीकडे पालकमंत्री नितीन राऊत, मंत्री सुनील केदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

 

Exit mobile version