Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नस्तनपूरच्या श्री क्षेत्राला तिर्थक्षेत्राचा दर्जा मात्र पर्यटनाचा नाही, किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष (व्हिडीओ)

जळगाव तुषार वाघुळदे । चाळीसगाव -नांदगाव रस्त्यावर अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक नस्तनपूर येथे प्रभू रामचंद्र स्थापित प्रसिद्ध श्री शनिदेव मंदिर आहे, त्यास तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे मात्र पर्यटन परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला नाही. तो देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जवळच नस्तनपूर किल्ला असून तोही अत्यंत प्राचीन आणि ब्रिटिशकालीन..!
” सूर्य पुत्रो देहो , विशालाक्ष: शिवप्रिय ।मंदचार प्रसन्नात्मा ,पिडां हरतू मे शनी । ओम शम शैनेश्चराय नम:।

पुण्यवान भारत भूमीत संतांच्या पदस्पर्शात पुलकीत झालेल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याचे अलौकिक स्थान आहे. नांदगाव जवळील श्री क्षेत्र नस्तनपूर येथील प्रसिध्द शनिदेव ..! देशभरातील शनी महाराजच्या साडेसात पीठांपैकी नस्तनपूर हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून अखिल भारतात ओळखलं जातं. आख्यायिकाप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्व हस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे.येथे अमावस्येला यात्रा भरत असते . दूरवरून तसेच इतर राज्यातूनही भाविक येत असतात.

जवळच खोजा राजाचा किल्ला आहे. नस्तनपूर भुईकोट मात्र कोणाला माहीत नाही .या किल्ल्याबद्दल बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात.किल्ल्याच्या बुरुजाबाहेर तोफगोळे दिसून येतात. समोरच सहा- सात फुटाची भिंत आहे. हा किल्ला जवळपास नऊ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला असून गडाच्या तटबंदी आहेत. गडाचे बुरुज आणि त्यावरील बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे ; याकडे पुरातत्व खात्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

किल्ल्यात तीन मोठ्या विहिरी आहेत.बुरुज वास्तूचा ‘हवामहाल’ म्हणून वापर केला जात असावा असे म्हटले जाते.ब्रिटिशांनी बांधकामास मनाई केल्याने काम थांबविण्यात आल्याने किल्ला अर्धवटच राहिला , या किल्ल्याच्या विटा , दगड स्थानिक लोकांनी काढल्याने खूप पडझड झाली आहे. या ठिकाणी खोजा नाईक नावाचा ‘भिल्ल’ राजा होता. सध्या नस्तनपूर किल्ल्याची विदारक स्थिती असून दुर्ग संवर्धकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तग धरून असलेले मोठे बुरुज कोरीवकाम असलेले मार्ग, दरवाजा, कचरा, घाण आणि मद्यपींचा मुक्त वावर यामुळे गडकिल्ल्यास अवकळा आली आहे. स्थिती गंभीर असून शासकीय यंत्रणा आणि पुरातत्व विभागानं याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी पुढे आली आहे.

 

Exit mobile version