नशिराबाद येथे शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. रविंद्र राजाराम पाटील (वय ५२, रा. नशिराबाद ता जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, रविंद्र पाटील हे नशिराबाद येथे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. अनेक वर्षांपासून पिढीजात शेती करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. बुधवारी १७ मे रोजी त्यांनी राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी छताला दोरी लावून गळफास घेतला. दरम्यान दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा घरी जेवणासाठी आला असताना त्याने वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यावेळी एकच हंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्यांनी रवींद्र पाटील यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयताच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला मिळाली असून पोलीस पुढील माहिती घेत आहे.

Protected Content