Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथील वृद्ध दाम्पत्याला गंडवले

FIR

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील वृध्द दाम्पत्याला दोन महिलांनी गंडविले असून हा प्रकार संमोहीत करून घडल्याची फिर्याद पोलीसात देण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, पुरुषोत्तम बारसू तेली (वय ६५, रा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर, नशिराबाद) व त्यांच्या पत्नी शकुंतला या दाम्पत्याची फसवणूक झाली आहे. २८ रोजी दुपारी दाम्पत्य घरात एकटेच होते. या वेळी दोन अनोळखी महिला त्यांच्या घरात आल्या. या महिलांनी दांपत्यास संमोहित केले. सोन्याची पोत, अंगठ्या वेली व कपाटात ठेवलेले ३० हजार रुपये रोख असा ऐवज काढून स्वत: तेली दाम्पत्याने या महिलांच्या हाती दिला.

तेली दाम्पत्यानेच या दोन्ही महिलांना रिक्षा स्टॉपपर्यंत आणून सोडले. तेथून दोन्ही महिला रिक्षेत बसून निघून गेल्या. यानंतर तेली दाम्पत्य परत घरी आले. काही वेळानंतर तेली दाम्पत्य शुद्धीवर आले. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्या अनोळखी महिलांनी संमोहीत करुन ऐवज काढून घेतल्याचे तेली दाम्पत्याच्या लक्षात आले. यांनतर त्यांनी नशिराबाद पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या महिला तूप विकण्याच्या नावाखाली या भागात आधी आल्या होत्या. यात ओळख निर्माण करून त्यांनी या दाम्पत्यास लुबाडल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, मोहन चौधरी हे करीत आहेत.

Exit mobile version