Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबादला शिवसेनेत ‘इनकमींग’; शेकडो तरूणांनी हाती घेतला भगवा !

 

नशिराबाद, ता. जळगाव  : प्रतिनिधी । शिवसंपर्क अभियानात आज नशिराबादेत शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला

 

नशिराबाद शहराच्या विकासाला आधीच गती देण्यात आली असून आता नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आपण शहराचा एक – दोन वर्षात कायापालट करून दाखवणार असून विकासाच्या या भूमिकेमुळेच शिवसेनेकडे तरूणांचा कल वाढल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयोजीत कार्यक्रमात शेकडो तरूणांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर आपण पहिली निवडणूक हरलो. मात्र जनतेशी संपर्क कायम ठेवल्यानंतर नंतर दोनदा विजय संपादन केला. यात आधी मंत्रीपद मिळाल्यानंतर नशिराबादच्या विकासकामांना निधी देता आला. मात्र आता विकासकामांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात भरून काढायचा आहे. यासाठी नगरपरिषदेचे माध्यम हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. नशिराबादचा एक – दोन वर्षात कायापालट करण्यात येईल असे अभिवचन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले.

 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे महामार्गाला लागून शिवसेनेचे प्रशस्त कार्यालय उभारण्याचा देखील आमचा मानस आहे. येथे विविध कार्यक्रमांसाठी सभागृह तसेच अद्ययावत व्यायामशाळा आणि वाचनालय देखील असेल. जेणेकरून शहरातील तरूणांना याचा लाभ होईल. ना. पाटील म्हणाले की, १९८४ साली आपण शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा जिल्ह्यात पक्षाचा एक सरपंच सुध्दा नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेनेने कॉंग्रेसची सत्ता उलथून टाकली. आजच्या युवा शिवसैनिकांना तर अतिशय अनुकुल अशी स्थिती आहे. शिवसेनेच्या विकासाभिमुख वाटचालीमुळे लोकांचा आमच्याकडे कल वाढत आहे. धरणगाव तालुक्यात हजारो शिवसैनिकांची नोंदणी करण्यात आली असून यात मुस्लीम बांधवांचाही समावेश  असल्याची माहिती त्यांनी दिली.  नशिराबादच्या आगामी निवडणुकीत नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकावणार असल्याचा संकल्प देखील त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे व त्यासाठी विक्रमी अशी शिवसैनिक नोंदणी करण्याचे आवाहन केले.

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे करीत असलेल्या विकासकामांमुळे नाशिराबाद येथिल फिरदोस मन्यार व मुस्लीम बांधवांसह सामाजिक कार्यकर्ते  भूषण कोल्हे, जगदीश माळी, दिगंबर पाटील, प्रदीप नाथ, चेतन पाटील, जितेंद्र वारके, अमर भालेराव, सागर माळी, राहुल देवळे, विशाल भोई, अजय ताडे, नारायण कोल्हे, रोहिदास नाथ , विकी डाके , राकेश वाळके , दीपक वारके , सोपान कोळी , गिरीश माळी , प्रफुल्ल पाटील , दिगंबर  माळी ,  सुधाकर पाटील , कल्पेश वानखेडे , कृष्णनाथ , ज्ञानेश्वर चौधरी , सुमित भोई यांच्यासह  शेकडो कार्यकर्त्यांनी  शिवसेनेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भगवा रुमाल गळ्यात टाकून  या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला

 

शिवसंपर्क अभियान प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णु  भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, चंदू भोळे, शहरप्रमुख विकास धनगर, कैलास  नेरकर , युवासेनेचे चेतन बरहाटे यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक चेतन बरहाटे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू खंडारे यांनी केले. आभार विकास धनगर यांनी मानले.

 

Exit mobile version