Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापराचा संकल्प करा – मोदी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या वर्षात स्वदेशी वस्तू वापराचा संकल्प करा असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मन की बात कार्यक्रमातून केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन केलं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे.

वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले,”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले,”व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा,” असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

“देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हानं होती, संकटं पण आले. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारतानं प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version