Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीन राष्ट्रीय शिक्षणिक धोरण संदर्भात विद्यापीठात कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमांना येत्या सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या तयारीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरूवार २७ एप्रिल रोजी झालेल्या कार्यशाळेत सर्वांगीण चर्चा करण्यात आली. येत्या महिन्याभरात शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत या धोरणाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात गुरूवारी दिवसभर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विद्यापीठाशी संलग्नित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य यांची कार्यशाळा घेण्यात आली. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने ही कार्यशाळा झाली.  शासनाने या धोरणासंदर्भात गठीत केलेल्या समितीचे सदस्य कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी यांनी पहिल्या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी प्रासताविक केले. प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी कला वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी शैक्षणिक धोरणाचा आराखडा कसा असेल यावर पॉवरपॉइंट सादरीकरण केले. त्यानंतर खुल्या चर्चेत प्राचार्य अनिल राव, प्रा. आर.डी. कुलकर्णी आणि प्रा. व्ही.एल. माहेश्चरी यांनी सहभाग घेवून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या धोरणाची अंमलबजावणी करतांना ज्या समस्या निर्माण होतील त्यावर तोडगा काढला जाईल. वर्कलोड मध्ये थोडा फरक पडेल. पारंपारिक विचार न करता नाविन्यपूर्ण केार्सेस तयार करावेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यापर्यंत सर्व माहिती व्हावी यासाठी जिल्हास्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा घेतल्या जातील असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि क्षमता याचा अंतर्भाव या धोरणात करण्यात आला असल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षणात अपेक्षित असलेले बदल या धोरणात असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मानसिकता तयार करावी लागेल असे प्रा. आर.डी. कुलकर्णी म्हणाले.

 

या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या श्रेयांक आणि अभ्यासक्रम आराखड्याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. नव्या धोरणानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे असेल त्याला ऑनर्स पदवी म्हटले जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम देखील कायम राहील. पहिल्यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस क्रेडिट गुणांकन पध्दतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाईल. प्रत्येक विषयाचे क्रेडीट निश्चित केले जाईल. शिक्षण सुरू असतांना विद्यार्थ्यांना मल्टीपल एन्ट्री आणि मल्टीपल एक्झीट काही अटींसह दिली जाईल. मात्र त्यासाठी सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडतांना दहा क्रेडीटच्या दोन महिन्यांची इंटर्नशिप आणि स्कील कोर्स. तसेच आवश्यक तेव्हढे क्रेडीट मिळवावे लागतील. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षांनंतर प्रमाणपत्र दिले जाईल. परंतु किमान ४० आणि कमाल ४४ क्रेडीट गरजेचे आहेत. दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे चार सेमिस्टर नंतर डिप्लोमा प्रमाणपत्र (किमान ८० व कमाल ८८ क्रेडीट गरजेचे) दिले जाईल. तिसऱ्यावर्षानंतर पदवी प्रमाणपत्र (किमान १२० व कमाल १३२ क्रेडीट गरजेचे) दिले जाईल. चौथ्यावर्षी आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशालायझेशन पूर्ण झाल्यानंतर ऑनर्स (किमान १६० व कमाल १७६ क्रेडीट गरजेचे)पदवी जाईल. चौथ्यावर्षात प्रतीसत्र किमान २० क्रेडीटसह इंटर्नशिप आणि मुख्य विषय अभ्यासक्रमात असतील. चार वर्षांची ऑनर्स पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर साठी एक वर्ष किंवा दोन सेमिस्टर पूर्ण करावे लागतील. या नवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात येतील. मायनर विभागात विद्यार्थ्यांना आपल्या शाखे व्यतिरीक्त आवड असलेला विषय शिकता येईल. तो विद्यार्थी इतर महाविद्यालयातूनही आवडीचा विषय शिकू शकेल.

 

दुपारच्या सत्रात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी  परीक्षा पध्दतीविषयी तसेच प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी परीक्षा पध्दतीत शिक्षकांच्या योगदानाविषयी संवाद साधला. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी  विद्यापीठ परीक्षांमधील आपली जबाबदारी याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी आभार मानले.

Exit mobile version