Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नववर्षात १० लाख रोजगार!

 

 

नवी दिल्ली i  वृत्तसंस्था । देशातील खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत सुमारे १० लाख नवे रोजगार निर्माण करण्याची शक्यता आहे. चालू वर्षात कोरोनामुळे या उद्योगावर मोठे संकट ओढवल्याने रोजगारांतही घट झाली आहे.

‘डाइनआउट’च्या अहवालानुसार नव्या वर्षात ४५ टक्के तरुण वर्ग ‘हेल्थ फूड’कडे वळण्याची शक्यता आहे. रेस्तराँचा प्रामुख्याने भर गमावलेले ग्राहक परत मिळवण्यावर राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात ९० टक्के रेस्तराँ डिजिटल मेन्यूंचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

 

‘डाइनआउट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोनाच्या संक्रमणामुळे देशातील खाद्यनिर्मिती उद्योग मोठ्या संकटातून जात आहे. मात्र, हळूहळू का होईना हा उद्योग सावरत असून, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत नव्याने १० लाख रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. रेस्तराँ उद्योगाचा चेहरामोहरा कमालीचा बदलला असून, हेल्दी फूडकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. क्लाउड किचनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, टेकअवे आणि घरपोच डिलिव्हरींचे प्रमाण वाढत आहे.’

‘डाइनआउट’च्या अहवालात नमूद केल्यानुसार २०२१मध्ये ग्राहकांकडून संपर्कविरहित डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात टेकअवे ऑर्डरमध्ये ३०.५ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. क्लाउड किचनचा बाजारहिस्सा सध्याच्या १३ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर जाण्याचीही शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत होम शेफची संख्या चौपटीने वाढण्याची शक्यता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लॉकडाउन लागू झाल्यानंतर खाद्यपदार्थ निर्मिती उद्योगाची अवस्था बिकट झाली असून, त्यामध्ये रेस्टॉरंटचाही समावेश आहे. लॉकडाउननंतर अनेक नियमांचे पालन करून हा उद्योग कसाबसा उभा राहिला आहे. कोरोनाचे आक्रमण होण्यापूर्वी या क्षेत्राने सत्तर लाखांहून अधिक जणांना रोजगाराची संधी दिली. ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एनआरआयए) आकडेवारीनुसार लॉकडाउनमुळे तीस टक्क्यांहून अधिक रेस्टॉरंट आणि बीअर बार कायमस्वरूपी बंद झाले आहेत.

Exit mobile version